मुक्तचिंतन

असंख्य चेहऱ्याची माणसं

सुट्टीचा दिवस घरी उकडत होतं म्हणून जवळच्याच मॉल मध्ये गेलो होतो, एरवी लहान आणि किराणा व्यवसायिकांच्या व्यवसायावर मॉल संस्कृतीने येणारं संकट बऱ्याच अंशी खरं असलं तरी मॉल मध्ये आल्यावर त्या गोष्टीचा विसर पडतो हे मात्र नक्की,
पण मॉल मध्ये आल्यावर एक गोष्ट मात्र प्रकर्षांने जाणवायला लागते ती म्हणजे पूर्वीची* पारदर्शक माणसं आता चेहऱ्यावरचे मुखवटे आणि दिखाउपणेचे रंग लावल्यामुळे अपारदर्शक होत चाललियत…
आता कुणी कसं वागायचं, कसं राहायचं याचे उपदेश मी कुणाला देत नाहीये, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तेवढा व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार घटनेनं सगळ्यांनाच दिलेला आहे, अगदी मलाही.
पण सामन्यात: माणूस जेवढा judgemental असतो मिहि तेवाढच सामान्य आहे..फक्त माझं व्यक्त होणं मला थांबवत नाही म्हणून मी लिहितो. याचा अर्थ मी बरोबरच असेन असाही नाही.
तर मूळ मुद्द्यावर परत येतो,
तर मला चेहरे पहायची आवड आहे, प्रत्येकाचे चेहरे न्याहाळायला भारी वाटतं (अर्थात एकटं फिरताना हे विनासायास शक्य होतं एवढंच). म्हणजे वेळही जातो आणि लोकांची व्हरायटी ही कळते, फिरताना सहज चेहरे पाहिलं की मग काही जोडपी** दिसतात, काही एकटे दुकटे, काही झुंडीने फिरणारे प्राणीही असतात. हवसे-गवसे-नवसे सगळे प्रकार इथे पाहायला मिळतील, आधी आम्ही वर्षाच्या गावजत्रेत आणि लग्नताच असे लोक पाहिलेले…
प्रत्येकाचा चेहरा काहीतरी गोष्ट सांगत असतो..काही खऱ्या काही खोट्या काही आपल्या काही ढापलेल्या, फक्त त्या वाचता आल्या की मग मजा येते…
एखाद्याचा चेहरा पाहून आपण आपली गोष्ट बनवायची..ती त्यांच्याशी किती सुसंगत असेल माहीत नाही..आपण आपले अंदाज बांधायचे.
पण एवढं आहे जेवढे काही चेहरे न्याहाळले ना त्यातले कितीतरी जण उत्तम अभिनय करणारे होते..आनंदाचा अभिनय, हसायचा अभिनय…एवढंच काय तर मोठेपणाचा पण अभिनय…
मुखवट्यांचं जग झालाय सगळं..क्षणाक्षणाला वेगवेगळ्या मुखवट्यांचे चेहरे, असंख्य चेहऱ्यांची गर्दी, आणि गर्दीतली असंख्य चेहऱ्याची माणसं..

तळटीप – मी जेवढा सामान्यपणे judgemental होतो तेवढे तुम्हीही हे वाचून व्हाल ही अपेक्षा.

संदर्भ –
*पूर्वीची – पूर्वीची म्हणजे आम्हा ९० च्या दशकात जन्माला आलेल्या मुलामुलींनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या भारतातील उत्क्रांतीच्या सुरुवातीपासून ते आज त्याच्या एक परमोच्च क्षणी पोहोचलेल्या संस्कृतीबदलाच्या प्रवाहापूर्वीची, सोबतची आणि नंतरची माणसं पहिली आहेत आणि त्यावरून जेवढं आकलन झालंय त्याच्या जोरावर ‘पूर्वीची’ असं लिहिलंय.
आणि अजून एक भारत पूर्वीपासूनच विज्ञाननिष्ठ आहे..फक्त मधला काही काळ कर्मठपणाच्या जोखडामध्ये अडकून पडलेला म्हणून ९० नंतरचा काळ हा विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीचा म्हणलोय उगमाचा नाही.

** जोडपी – यात लग्न झालेली, न झालेली, काही रिकामी काही लेकरा बाळांसाहित, काही जुन झालेली काही नवीन आशा सर्व जोडप्यांच्या समावेश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *