काहीबाही

काहीबाही ६ – खजिना

परवा मिळाले काही,
पुसट झालेल्या अक्षरांचे निनावी कागद,
झिरझीर झालेली जाळीदार पिंपळपानं,
काटे नसलेला पण दरवळणारा तो गुलाब,
तो शाईपेन आणि एकंच पान लिहिलेली डायरी,
त्यातलेही काही शब्द कसल्याश्या पाण्याने पुसटलेले,
आणि एका पुरचुंडीत बांधलेले क्षणही सापडले
अबोल्याचे, रुसव्याचे, प्रेमाचे, ओढीचे,
काही तुझे, काही माझे
सारे एकमेकांना घट्ट बिलगून बसलेले.
खूप काही सापडलं आणि वाटलं हाच तो
मी ना शोधलेला पण अनाहूतपणे सापडलेला #खजिना,
प्रत्येकाला किमान एकदा तरी घराच्या किंवा
मनाच्या अडगळीत सापडतोच असा.

©संदेश मुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *